पिंपरी चिंचवड : ( प्रतिनिधी : अमोल बेडके ) : शहरात दिवसा ढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश ककराणी (वय २०) या युवकावर त्याच्याच किराणा दुकानात घुसून अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. या हल्ल्यात भावेशच्या मांडीवर गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने दुकानात शिरताच जवळून गोळीबार केला आणि लगेचच घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत भावेशला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून, सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.
दरम्यान, स्थानिक नगरसेवक डब्बू असवाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन ककराणी कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांच्या सुरक्षेबाबत आश्वासन दिले.
पोलीसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
