पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : अमोल बेडके ) : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पियुष अशोक कवडे (वय २३) या तरुण आयटी अभियंत्याने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २८ जुलै) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष गेल्या एक वर्षापासून हिंजवडी फेज-वनमधील ‘ॲटलस’ या नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी त्याची मिटिंग सुरू असताना त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले आणि बाहेर पडला. काही क्षणातच त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी घेत आपले प्राण गमावले. या घटनेनंतर कंपनीत आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
पियुषने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये “मी आयुष्यात सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलो आहे. मला माफ करा.” असे भावनिक उद्गार लिहिले आहेत.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
