पिंपरी : ( प्रतिनिधी : संजय वाईकर ) : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सेट श्री आर. व्ही. गोसलिया शिशुविहार व श्री गुरु गणेश बालक मंदिरात ‘बाहुला-बाहुली विवाह’ सोहळा मोठ्या उत्साहात, पारंपरिक थाटात आणि बालमित्रांच्या आनंदाच्या कल्लोळात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासोबतच त्यांना सामाजिक व संस्कारक्षम शिक्षण देण्याचा उद्देश यामागे होता. कार्यक्रमात हळद, मेंदी, रुखवत, सासरवाडी, वरात, लग्न विधी अशा पारंपरिक गोष्टींचे रूपांतर बालसुलभ कृतीतून विद्यार्थ्यांनी सादर केले.
गोजिरी बाहुली आणि हसऱ्या बाहुल्याच्या विवाहात मुलांनी वरातीत नाचत, गात, रंगतदार पोशाखात सहभाग घेतला. वर्गखोल्यांचे रुपांतर मांडवात आणि मंडपात झाले होते. रुखवतामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली कलाकृती, हस्तकला, आणि सजावट विशेष लक्षवेधी ठरली.
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना “लैंगिक समानता, परस्पर सन्मान आणि संस्कारशील सहजीवन” यांचे महत्व सांगण्यात आले.
“मुलींना निर्भय, स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनवा, तर मुलांना समजून घेणारे, आदर करणारे आणि जबाबदार बनवा” असा प्रभावी संदेश पालकांना या निमित्ताने देण्यात आला.
“नटूनथटून बाहुला आला , हातामध्ये फुलांचा माळा” “बाहुलीची ओटी भरली,
आनंदाने वरात निघाली”
“गाणं नाचं हास्य खेळ,
लुटला लहानग्यांनी मेळ”
“शिकवण दिली समाजाला,
प्रेम द्यावं मनापासून जळा !”
कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. ऍड. श्री राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी मा. प्रा. श्री अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांची विशेष उपस्थिती लाभली.
मुख्याध्यापिका लता पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. सूत्रसंचालन अपर्णा वांगीकर यांनी उत्साहीपणे पार पाडले तर आभार प्रदर्शन मधुरा कांबळे यांनी केले.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव तर मिळालाच, पण शिक्षणाची नवी आणि संस्मरणीय पद्धत शाळेने साकारली.
