पंढरपूर (प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे): श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गैरकारभारावर महाराष्ट्रभरातून होणाऱ्या टीकेला आता पंढरपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनीही सुरात सूर मिसळत थेट श्रीविठ्ठलाच्या चरणी साकडे घातले आहे.
मंदिर प्रशासनाविरोधात अंकुशराव यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आवाज उठवत विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे – दर्शन रांगेतील भाविकांना होणारी मारहाण, सुरक्षा रक्षकांची मुजोरी, व्हीआयपी दर्शनावरील वाद, गोशाळेतील गोमाता आणि गोवंशाच्या सुरक्षेचा प्रश्न, स्वच्छतेच्या टेंडरमधील कथित घोटाळे, तसेच मंदिर संवर्धनाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाळ्यात होणारी गळती आदी बाबींवरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
याआधीही त्यांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर वारंवार लक्ष वेधले होते. मात्र यावेळी त्यांनी एक पाऊल पुढे जात, थेट विठ्ठलाच्या चरणांवर निवेदन ठेवून मंदिर समितीच्या भोंगळ कारभारावर फटकारा मारला.
“बा विठ्ठला, आता तूच शासनाला सद्बुद्धी दे. मंदिर समितीचा भोंगळ कारभार उघड कर आणि दोषींना कडक शासन करण्यासाठी तुझी काठी उचल!” अशी भावनिक साद गणेश अंकुशराव यांनी घातली आहे.
