निगडी | प्रतिनिधी : ( शुभम जाधव ) पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढत असतानाच निगडी प्राधिकरणातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दि. १९ जुलै २०२५ रोजी रात्री ८.५५ ते १०.३० वाजताच्या सुमारास, प्लॉट नं. १८, सेक्टर नं. २७, निगडी प्राधिकरण, पुणे येथे राहणाऱ्या चंद्रभान छोटेराम अगरवाल (वय ७६) या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात ४ अनोळखी पुरुष व १ महिला यांनी सशस्त्रपणे प्रवेश करत लुटमार केली.
सदर आरोपींनी फिर्यादी हे घरात टीव्ही पाहत असताना त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून “तिजोरी किधर रखा है?” असा दम दिला. फिर्यादींनी “घरात तिजोरी नाही” असे सांगितले असतानाच आरोपींनी त्यांना मागील खोलीत नेऊन हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली व जबरदस्तीने कपाटांच्या चाव्या विचारल्या. कपाटे उघडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून तपासणी केली.
या गुन्ह्यात आरोपींनी घरातील वरील मजल्यावरील कपाटातून सुमारे:
₹४,८०,०००/- किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने
₹१,३५,०००/- किंमतीची सोन्याची चैन
टायटन कंपनीच्या दोन घड्याळा
पाकिटातील ₹५,००० ते ₹६,०००/- रोख रक्कम
फिर्यादी व त्यांच्या पत्नीची आधारकार्डे आणि गाडीची R.C. बुक
असा एकूण सुमारे ₹६.२५ लाखांचा ऐवज लंपास केला.
पोलिस तपास सुरु; CCTV फुटेज तपासणी.
या घटनेनंतर २० जुलै रोजी पहाटे ५:४८ वा. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अधिकारी सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील हालचाली व पूर्वीच्या गुन्हेगारांची माहिती गोळा करत आहेत.
सदर प्रकरणी पोस्टे व गु.रजि. नं. :- निगडी २९६/२०२५ नुसार खालील कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे:
भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम ३१०(२), १२७(२)
भारतीय हत्यार कायदा कलम ३, २७, ४, २५
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५
वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे वयोवृद्ध एकट्याने राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे समोर आला आहे.
पोलिस प्रशासनाकडून परिसरात गस्त वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
