(प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे)

पंढरपूर :  भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या दिशेने शिर्डीहून पायी निघालेला विश्वसंत सद्गुरू साईबाबा पालखी सोहळा आता पंढरपूरच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. आपल्या सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी व मनातील श्रद्धा व भक्ती व्यक्त करण्यासाठी हजारो भाविक विंचू, वीस–पंचवीस दिवसांचा प्रदीर्घ पायी प्रवास करत या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

साईबाबा पालखी सोहळ्याचे हे सलग 19 वे वर्ष असून, श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशीकानंदजी महाराज परमहंस, संस्थापक अध्यक्ष साईबाबा पालखी सोहळा, शिर्डी यांच्या आशीर्वादाने हा भक्तीमय सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने पुढे सरकत आहे. तन, मन, धनाची पर्वा न करता आपल्या विठ्ठलमाऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान व आनंद वेगळाच दिसून येत आहे.

 

या पालखी सोहळ्याचे नियोजन व संयोजन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हभप श्री विश्राम महाराज ढमाले, दत्तात्रय डांगे पाटील, तुषारभाऊ चौधरी, शंकर नाना फटांगरे, दिलीप आरोटे, रमेश महाराज क्षीरसागर हे सातत्याने समर्थपणे पार पाडत आहेत. सोहळ्याचे शिस्तबद्ध नियोजन, भोजन, विसावा आणि भाविकांच्या सुविधा यांची विशेष काळजी घेतली जात आहे.

साईबाबा पालखी सोहळा विठुरायाच्या दर्शनासाठी अवघ्या काही अंतरावर येऊन ठेपला असून, पंढरपूर नगरीत दाखल होण्याची उत्सुकता वारकऱ्यांत शिगेला पोहोचली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version