पुणे : कात्रजमधील सुखसागर नगर परिसरात यशश्री सोसायटीसमोर आज (शुक्रवारी) दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात श्रेया गौतम येवले (वय २१, रा. शीतल हाईट्स, खंडोबा मंदिराजवळ, कोंढवा, पुणे) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
भरधाव टुरिस्ट वॅगन आर कारने (क्र. एमएच १२ यु. एम. ४८४७) फुटपाथवर चालणाऱ्या श्रेयाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७, रा. गोकुळ नगर) मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसला. यावेळी कार नारळाच्या झाडाला धडकून समोर असलेल्या बदामाच्या झाडात अडकली. झाड आणि कारच्या मध्ये सापडून श्रेयाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ, बिबवेवाडी आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. चालक सतीश होनमाने याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिकांमध्ये संताप, कठोर कारवाईची मागणी –
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करून संताप व्यक्त केला. वाहनचालकावर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे. नुकताच गंगाधाम चौकात एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा कात्रजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि रोष निर्माण झाला आहे. स्थानिकांनी रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे.
