सोलापूर :  राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलांनी वैष्णवीचा छळ केल्याचे समोर आले होते.

तसेच लग्नामध्ये हुंडा म्हणून फॉर्च्यूनरही घेतली होती. याप्रकरणानंतर हुंड्यात मिळालेली गाडी घेऊन रुबाब दाखवणारे म्हणत हगवणे कुटुंबावर प्रचंड टीका होत आहे. अशातच सोलापूरमधील एका फॉर्च्यूनर मालकाने हगवणे प्रकरणानंतर आपल्या गाडीवर लिहलेल्या मजकूराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

काय आहे प्रकरण ?

राज्यात चर्चेत असलेल्या हगवणे प्रकरणात फॉर्च्यूनर गाडीचा मोठा गाजावाजा झाला. हगवणे प्रकरणामुळे फॉर्च्युनर वापरणाऱ्या गाडी मालकांकडे सध्या संशयान पाहिलं जाते आहे. हुंड्यात मिळालेली फॉर्च्युनर आहे का? अशीही चर्चा लोक करतात. म्हणूनच करमाळ्याच्या अतुल खूपसे यांनी आपल्या फॉर्च्यूनर गाडीवर ” रोखीत विकत घेतलेली माझी घरची राणी….” अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.

‘हगवणेमुळे फोरचुनर जातीला लोकांनी धु धू धुतलय…’ असेही लिहायला खूपसे विसरले नाहीत. खूपसे यांच्या फॉर्च्यूनर गाडीवरील मजकूर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंग होत आहे. “तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र मला बदनाम केलं हगवणे यांनी. मी फॉर्च्यूनर माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा, अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलंय, “ असा मजकूर या गाडीवर लिहण्यात आला आहे.

दरम्यान, सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना फॉर्च्युनर गाडी घ्यायची तर दोन तीन वर्ष पैसे जमा करायचे किंवा बँकेचे लोन काढावे लागते. एवढी चांगली हगवणे कुटुंबामुळे ही गाडी बदनामी झाली. कुठेही गेलो हॉटेलवर जेवायला थांबलो तरी विचारतात तुमची आहे का सासऱ्यांनी दिली? त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात मुली दिल्या तर अशी प्रकरणे होणार नाहीत, असे अतुल खुपसे यांनी म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version