|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे ||
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील मौजे शिरढोण येथील ग्रामसेविका जाडकर मॅडम यांनी पदाचा दुरुपयोग करून अर्जदाराचे हक्काचे मालकी हक्क असलेली मालमत्ता नियमबाह्य पद्धतीने अर्जदाराच्या आईच्या नावे लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवित, रहिवासी मारुती दत्तू भुसनर यांनी आज पंचायत समिती पंढरपूर येथे उपोषण सुरु केले आहे.
अर्जदार भुसनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गट नंबर ३३ मधील ० हे ३९ आर क्षेत्रापैकी १९.५ आर क्षेत्र त्याच्या नावावर असून त्याच ठिकाणी त्यांचे राहते घर आहे. मात्र, सदर घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी मालमत्ता क्रमांक २४७ अंतर्गत त्यांच्या आई सौ. यशोदा दत्तू भुसनर यांच्या नावे ग्रामसेविकेने चुकीच्या पद्धतीने केली आहे.
तसेच, त्यांनी सांगितले की, त्यांच्या आईकडून त्यांनी बक्षीस पत्र करून घेतले असून त्यानंतर संबंधित मालमत्ता त्यांच्या नावावर लावण्यात यावी, अशी विनंती बिगर जिल्हा अधिकारी (BDO) यांच्याकडे केली होती. त्यानंतर बीडीओ साहेबांनी दिनांक १४/०२/२००५ रोजी ग्रामपंचायत शिरढोण यांना नोटीस काढून, नियमाप्रमाणे ग्रामपंचायत नमुना ८ वर नोंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही ग्रामसेविका जाडकर यांनी आदेशाची अंमलबजावणी न करता मनमानी वर्तन केले, असे भुसनर यांनी आरोप केले.
या प्रकरणात न्याय न मिळाल्यास संबंधित ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
