चाकण : चाकण औद्योगिक भागातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रपाळीत कामावर निघालेल्या २७ वर्षीय महिलेला अंधाराचा फायदा घेत एका नराधमाने मारहाण केली. त्यानंतर रस्त्यातून लगतच्या झुडपांमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

ही घटना मंगळवारी (दि.१४) चाकण लगतच्या मेदनकरवाडी (ता. खेड) येथे घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी काही पथकांच्या मदतीने आणि तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान बुधवारी (दि.१४) रात्री आठच्या सुमारास संशयित म्हणून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकाश सखाराम भागरे (सध्या रा. मेदनकरवाडी चाकण, ता. खेड, मूळ रा. अकोला) असे या संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चाकण पोलिस ठाणे हद्दीतील मेदनकरवाडी येथे मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास एक महिला रात्री कंपनीत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली. मेदनकरवाडी येथे रात्रीच्या वेळी निर्जन असलेल्या रस्त्यावर एका २० ते २५ वर्षीय नराधमाने महिलेला एकटीला पाहून मारहाण करत रस्त्याच्या लगत झुडपांमध्ये नेले. तेथे तिच्यावर मारहाण करत लैंगिक अत्याचार केले. एकदा अत्याचार केल्यानंतर पुन्हा तो अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी रस्त्याने काही लोक जात असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाचे लक्ष या झुडपात गेले. त्यानंतर नराधम आरोपीने येथून पळ काढला. त्यानंतर याबाबत चाकण पोलिसांना माहिती देण्यात आली. पीडित महिलेला तात्काळ पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रात्रीपासून चाकण पोलिसांचा मोठा फौजफाटा मेदनकरवाडी भागात नराधमाचा शोध घेत आहे. परिसरातील घटनेच्या कालावधीतील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यानंतर मेदनकरवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या प्रकाश भागरे याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त, सहायक पोलिस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागाला भेटी दिल्या आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version