|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजता कोमल भरत जाधव (वय १८) या तरुणीची दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवर आले होते आणि त्यांनी कोमलवर भररस्त्यात वार करत तिचा जागीच खून केला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी कृष्णाई कॉलनी परिसरात फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलिसांनी त्यावरून तपासाची चक्रे फिरवली आहेत. सध्या अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
कोमल जाधव हिची हत्या नेमकी का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले असून लवकरच मारेकरी गजाआड जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
