जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर एका लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये धडाधड गोळ्या झाडल्या आहेत.

या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. तर जावई गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

तर, घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झाला आहे. ही घटना चोपडा शहरातील डॉ.आंबेडकर नगर परिसरात काल शनिवारी (दि. २७६) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तृप्ती अविनाश वाघ (वय-२४) असं मृत विवाहितेचे नाव आहे. तर किरण अर्जुन मंगले (वय ४८, रा.शिरपूर) असं आरोपी वडिलांचं नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तृप्तीने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (वय २८, दोधे रा.करवंद, शिरपूर, सध्या वास्तव्यास असलेले कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. आरोपी वडील किरण मंगले याला हा विवाह पसंत नव्हता. बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते. बहिणीच्या हळदीसाठी लेक आणि जावई त्याठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली.

अविनाश याच्या बहिणीची हळद काल शनिवारी( दि. २६) चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकरनगर येथे होती. त्या निमित्ताने ते चोपडा येथे आले होते. त्यात तृप्तीने प्रेम विवाह केल्याचा राग वडील निवृत्त सीआरपीएफ किरण मंगले यांच्या मनात होता. हळद सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत मुलगी तृप्तीचा मृत्यू झाला. तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव येथील रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या वडिलाला मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version