|| प्रतिनिधी : किरण अडागळे ||
देहूगाव : देहूगाव ते देहूरोड कमान हा पाच किलोमीटरचा पालखी मार्ग आहे. माळीनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीपासून ते देहूरोडच्या कमानीपर्यंत तब्बल 21 गतिरोधक टाकण्यात आले आहेत.
त्यातील अनेक गतिरोधक नियमबाह्य असल्याचे दिसत आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे अनधिकृत गतिरोधक हटविण्याची मागणी नागरिक, वाहनचालकांकडून केली जात आहे.
वाहनांचे नुकसान
संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या नोंदीबाबत शासन दप्तरी संदिग्धता दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पावलोपावली छोटे-मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. त्यातच अनावश्यक आणि नियमबाह्य गतिरोधकामुळे दररोज या रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अनेक चालकांना मणक्याचा आजार जडला आहे. तर, खड्डे आणि गतिरोधकामुळे वाहनांचे नुकसानही होत आहे.
वाहतूक कोंडीने चालक त्रस्त
या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हजारो वाहने या मार्गावरून धावत असतात, परंतु देहूगाव ते देहूरोड हा पालखी अरुंद आहे आणि त्यातच रस्त्यावर पडलेले खड्डे आणि 31 गतिरोधक यामुळे सकाळ, संध्याकाळ येथे वाहतूककोंडी होत आहे. तासनतास या कोंडीत चालक, कामगार अडकून पडत आहेत. ही कोंडी आता नित्याचीच बाब झाली असून, माळीनगर ते देहूरोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. अशावेळेस रुग्णवाहिकेलादेखील रस्ता मिळत नाही. अशी वाईट अवस्था या पालखी मार्गाची झाली आहे.
