|| प्रतिनिधी : किरण आडागळे ||
देहूरोड : धुळवड साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या मित्रांपैकी एक मित्र बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. देहूरोड किन्हईजवळ इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात आज दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
राज दिलीप अघमे (वय २५, रा. घरकुल, चिखली), आकाश विठ्ठल गोरडे (वय २४, रा. घरकुल, चिखली) व गौतम कांबळे (वय २४, लोकमान्य हॉस्पिटल) अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात जल उपसा केंद्राजवळ सहा तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यापैकी एक तरुण बुडत असताना त्याला वाचवायला त्याचे मित्र गेले. बुडणारा तरुण वाचला मात्र त्याच्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या टीमने इंद्रायणी नदी पात्रात शोध कार्य राबवून तिघांचे मृतदेह संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास बाहेर काढले. वन्यजीव रक्षक मावळच्या टीममध्ये निलेश गराडे, भास्कर माळी मामा, विनय सावंत, गणेश गायकवाड, शुभम काकडे, रवी कोळी, गणेश सोंडेकर, विकास दोड्डी, प्रमोद जाधव यांचा समावेश होता.
या दुर्घटनेची माहिती समजताच वन्यजीव रक्षक मावळ, एनडीआरएफ, पीएमआरडीए, अग्निशमन दल यांची बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली व त्यांनी शोध मोहीम राबवली.
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
