लातूर : बीडनंतर आता लातूरमध्येही तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लातूरच्या रस्त्यावर एका तरुणाला 5-7 जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांमध्ये वाद झाला, या वादानंतर तरुणाच्या डोक्यात दगड घालून तसंच तरुणाचे कपडे काढून अमानुष मारहाण करण्यात आली.
या हल्ल्यात तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.
मराठवाड्यातील बीड पाठोपाठ आता लातूरमध्येही भरदिवसा मुख्य रस्त्यावर तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता. याच ठिकाणी असलेल्या राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांचा वाद झाला.
नग्न करून बेदम मारहाण
बारमध्ये हाणामारी झाल्यानंतर हा वाद रस्त्यावर आला. रस्त्यावर 5-7 जणांनी मिळून एका तरुणाला नग्न करून मारहाण केली. तसंच त्याच्या डोक्यात, अंगावर दगडंही मारण्यात आली. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे. याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी जखमी तरुणाला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
तरुणावर हल्ला करून आरोपी फरार झाले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत, अशी माहिती लातूर पोलिसांनी दिली आहे.
