|| प्रतिनिधी : अरविंद भोंगळे ||
पुणे : पुण्याच्या येरवडा परिसरातील शास्त्रीनगर इथं रस्त्यावर उभं राहून लघुशंका करणाऱ्या गौरव अहुजाचा पुणे पोलिसांनी माज उतरवला आहे. तीन दिवसांपूर्वी बड्या बापाचा मुलगा गौरव अहुजा याने शास्त्रीनगर परिसरात सिग्नलवर आपली अलिशान बीएमडब्लू कार लावली होती.
कार थांबवून तो रस्त्यातच लघुशंका करण्यासाठी उभा राहिला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने अहुजाचा हा कांड आपल्या फोनमध्ये कैद केला.
यावेळी माजोरड्या गौरवने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील कृत्य केलं. त्याने ऑन कॅमेरा आपलं गुप्तांग दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनंतर दुसऱ्या दिवशी गौरव अहुजाने एक व्हिडीओ जारी करत पुणेकरांची माफी मागितली. तसेच एक संधी द्यावी अशी विनंती केली. यानंतर त्याने कराड पोलिसांकडे स्वत:ला सरेंडर केलं. यानंतर कराड पोलिसांनी गौरव अहुजाला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं.
आता पुणे पोलिसांनी गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओस्वाल यांचा माज उतरवला आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी दोघांनाही घटनास्थळी नेलं. ज्या ठिकाणी गौरव अहुजाने भररस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केलं होतं. त्याच ठिकाणी घेऊन जात पोलिसांनी दोघांची धिंड काढली. पोलिसांनी त्यांचा माज उतरवला आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गौरव आहुजाने पळून गेल्यावर आपल्या कारची नंबरप्लेट काढून टाकली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २३८ नुसार पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. शिवाय पोलिसांना गौरवच्या कारमध्ये दारुची बाटली आणि ग्लास आढळले. या प्रकरणी पोलिसांनी गौरव आणि त्याचा मित्र भाग्येशला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पुन्हा न्यायालयात हजर केलं, यावेळी पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
