छत्रपती संभाजीनगर : वारंवार येणाऱ्या गुन्हेगारीच्या बातम्यांनी महाराष्ट्र अक्षरश: ढवळून निघाला आहे. संतोष देशमुखांवरील निघृणपणे केलेल्या अत्याचाराचे फोटो प्रसारमाध्यमातून समोर आल्यानंतर महाराष्ट्र सुन्न झाला.

इतक्या क्रूरपणे कोणी कोणाचीही हत्या कसं करू शकतं? असा सवाल ते फोटो पाहणाऱ्या प्रत्येकाला पडला होता. स्वारगेट बस स्टँडवरील तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतून महिला सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून महाराष्ट्राला हादरवणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

एका 19 वर्षांच्या विकृत मानसिकतेच्या तरुणाने 36 वर्षांच्या विवाहित तरुणीच्या शरीरावर धारदार चाकूने वार केले. अभिषेक तात्याराव नवपुते असं या मुलाचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा विकृत मानसिकतेचा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून विवाहित तरुणीचा पाठलाग करीत होता. हे तरुणीच्याही लक्षात आलं होतं. मात्र तिने याकडे दुर्लक्ष केलं. 2 मार्च रोजी विवाहित तरुणी शेतात काम करीत असताना अभिषेक तिच्याजवळ गेला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. याचा विवाहितेने विरोध केला. यानंतर मुलाने तिच्यावर तब्बल 15 वेळा वार केले. तिच्या गळ्यावर, मानेवर, पोटावर, चेहऱ्यावर असे 15 वेळा वार करण्यात आले. यानंतर विवाहित गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात ती जमिनीवरच कोसळली. तिचा मृत्यू झाल्याचं समजून आरोपीने तिथून पळ काढला.

शेतात महिला बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिला शरीरभर 280 टाके पडल्याची माहिती समोर आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version