|| प्रतिनिधी : ज्योतिराम कांबळे ||

पंढरपूर : आज दुपारी पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रूक्मिणी भक्त निवास मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सुरू असतानाच गेल्या अनेक दिवसांपासून मंदिर समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवणारे पंढरपूर येथील समाजसेवक गणेश अंकुशराव व महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत येऊन निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना गणेश अंकुशराव यांनी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी श्री.शेळके व व्यवस्थापक श्री.श्रोत्री यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करताना मंदिर समितीच्या कारभाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.

पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी ची वेळ वाढवून दिली जात नाही, मंदिराचे संवर्धनाचे कामात घोटाळा आहे, मंदिर समितीकडून महिला भाविकांसाठी अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जात नाहीत, विठ्ठल रूक्मिणीमाता विवाह सोहळ्यात देवाला बाशिंग बांधले गेले नाही, देवाच्या जलद दर्शनासाठी सोडणारे एजंट सापडले त्यांचेवर कारवाई झाली, पण दोषी अधिकारी मोकाट आहेत, साक्षात पांडुरंगासोबत विष्णु पदावर आलेला गोवंश चंद्रभागेच्या पात्रात मोकाट फिरत असुन यांचे अस्तित्व धोक्यात आहे, याकडे मंदिर समिती दुर्लक्ष करत आहे. मंदिर समितीचं माघी वारीत मागील वर्षी पेक्षा उत्पन्न का घटलंय ? टोकन दर्शन व्यवस्था सुरू करावी, मंदिर समिती च्या स्वच्छता टेंडरमध्ये मोठा घोटाळा आहे याकडे मंदिर समिती दुर्लक्ष करत आहे. यासह अनेक प्रश्न उपस्थित करत मंदिर समितीच्या गैरकारभाराचा पाढा वाचून दाखवला.

यावेळी मंदिर समिती चे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी मंदिर समिती बरखास्त करा अशी जोरदार घोषणाबाजी केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version