भिगवण : भिगवण पोलिसांनी उजनीच्या पात्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अखेर दिलासा दिला. कारण मच्छीमारांच्या बोटीची इंजिन गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीला जात होती.
एका शेतकऱ्याने वैतागून बोटीच्या इंजिनलाच जीपीएस लावला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून बिनधास्तपणे चोरी करणारे चोर सापडले. आता ज्यांनी चोरी केली व पोलिसांना सापडले, त्यांच्याकडून भिगवण पोलिसांनी चार इंजिन आणि आठ लाख तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उजनीच्या पात्रात मच्छीमारांच्या बोटीची इंजिन चोरणारे दत्तू हिरामण घटे व रमेश हिरामण गव्हाणे (दोघेही रा. वरखडे ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली, तेव्हा त्यांच्याकडून भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंजिन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. 26 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी साडेसात ते 27 जानेवारी 2025 रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या पर्यंत इंदापूर तालुक्यातील धुमाळवाडी व कुंभारगाव या गावच्या हद्दीतून भीमा नदीच्या पात्रात बोटीचे इंजिन चोरी झाले होते.
दरम्यान अनेक मच्छीमारांची बोटीची इंजिनी गेल्या अनेक महिन्यापासून चोरीला जात असल्याबद्दल गावच्या सरपंच उज्वला परदेशी यांनी वरिष्ठ स्तरापर्यंत पाठपुरावा केला होता. अनेक मच्छीमारांनी तक्रारी दिले नव्हत्या मात्र डोक्यावरून पाणी गेल्याने मच्छीमारांना दिलासा देण्याची गरज होती.
सुदैवाने ज्या बोटीचे इंजिन चोरी झाले होते, त्या बोटीवरील या इंजिनाला कुंभारगाव येथील अनिल नामदेव धुमाळ यांनी जीपीएस जोडले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून मच्छीमारांची बोटीची इंजिने चोरीला जात आहेत. या पार्श्वभूमीवर वैतागून हा जीपीएस चा फंडा धुमाळ यांनी शोधला आणि त्याचा फायदा देखील झाला.
धुमाळ यांनी त्यांच्या बोटीतील होंडा कंपनीचे पाच अश्वशक्तीचे इंजिन चोरीला गेल्याची फिर्याद दिली आणि पोलिसांना जीपीएस संदर्भातील माहिती देखील दिली. त्यावरून भिगवणचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी एक पथक तैनात केले. जीपीएस आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथक या दोघांपर्यंत पोहोचले आणि दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी आणखी चार गुन्हे केल्याची कबूल केली त्यांच्याकडून चार बोटीची इंजिनी व एक लोखंडी बोट असा आठ लाख तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवणचे सहाय्यक निरीक्षक विनोद महांगडे, फौजदार प्रवीण जर्दे, विठ्ठल वारगड, पांडुरंग गोरवे, सुभाष गायकवाड, प्रसाद पवार, सचिन पवार, रणजीत मुळीक यांच्या पथकाने केली.
